श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था, विष्णूपुरी, नांदेड येथे दिनांक १४ फेब्रुवारी, २०२६ रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन हे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य मा. सौ. राजश्रीताई पाटील, श्री संत बाबा सुखविंदर सिंघजी, डॉ. डी डी डोये, डॉ. मेघा जोनेलगेड्डा, यांचेसह अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. अभिजित नांदेडकर, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख व विद्यार्थी प्रतिनिधी भागवत कमळीकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि विद्यापीठ गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख, यांनी केले. प्रस्तावित करताना त्यांनी परीक्षा पद्धती ही अशी असायला पाहिजे की ज्यात सुधारणेला वाव असावा. याच बरोबर यावर्षी एकूण पदवी घेण्यास पात्र विद्यार्थी, त्यापैकी पदवीची मागणी केलेले विद्यार्थी, उपस्थित राहण्यास संमती दर्शविलेले विद्यार्थी व पदवी घेण्यासाठी उपस्थित विद्यार्थी याची माहिती दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. अशोक महाजन म्हणाले की, ही पदवी मिळवण्यासाठी चार वर्षात विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतलेले (ज्ञान गृहण केलेले आहे) ते जीवनभर उपयोगी पडणार आहे. आपणास आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र हे स्वप्न पाहावयाची आहेत आणि ती सत्यात उतरावयाची आहेत. भारताने इंडिया सेमी कंडक्टर मिशन २.० (डिसेंबर २०२१) जाहीर केलेले आहे. तुम्ही तर जनरेशन झेड जनरेशन अल्फा आहात, ज्यांच्याकडे ए. आय. सारखी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्याचा वापर भारताच्या व जगाच्या कल्याणासाठी करावाचा आहे.
विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभासाठी दाखवलेली शिस्त व शालेय विद्यार्थ्याकडून शिस्तबद्ध लेझीम पाहून मी भारावून गेलेलो आहे. आपणास पुढील जीवनासाठी सुभेच्छा.
या प्रसंगी बोलताना गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष तथा संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य सौ. राजश्री ताई पाटील म्हणाल्या, या प्रसंगी आपण फक्त पदवी घेण्यासाठी इथे आला नाहीत तर चार वर्षात अनुभवलेले क्षण, सुखदुःख, मित्र मैत्रिणी सोबत शेअर केलेल्या गोष्टी, झालेली भांडणे या सर्व समिश्र भावभावना व आठवणीचा पेटारा आपण सोबत घेऊन जात आहात, व गुरुजन ज्यांनी अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानरूपी अंजनाचा प्रकाश घालून विद्यार्थ्यांचे जीवन घडवलेले आहे.
इथून घेऊन जात असलेले ज्ञान (पदवी) तर आपणास उपयोगी येणारच आहे, त्या पेक्षाही म्हत्वाचे म्हणजे आपल्यावर झालेले संस्कार व तयार झालेली आपली विचार प्रणाली. जर पदवीचाच विचार करीत असाल तर न शिकलेले लोक सुद्धा कामधंदा करून आपले पोट भरतातच.
विचार करण्यासारखी गोष्ट म्हाणजे तुम्ही जगात किती ताकतीनिशी, ध्येयानिशी, मूल्यावर जगता यावर आपले यश अवलंबून आहे. जिद्द, सातत्य, मेहनत करायची तयारी, आयुष्य यशस्वि बनवते. जीवनात पैशाला दुय्यम स्थान देऊ नका, जीवनात पैसाच सर्व काही नाही पण पैशाशिवाय काहीही नाही हेही विसरून चालणार नाही. पैसा कमावणे यावर कोणी बोलत नाही. चांगले काम करून कष्ट करून सुद्धा पैसा कमावता येतो.
अभियंता या शब्दाची फोड केल्यास अभि म्हणजे समोर, समोर जाणारा, मार्ग दाखवणारा, दिशा दाखवणारा आणि यंता म्हणजे साधनानी काम करणारा, यंत्राचा वापर करणारा. नौकरी मागणारा पेक्षा नौकरी देणारे बना. स्वतः मधले स्किल डेव्हलप करा, वाटा निर्माण करा, त्यावर चालण्याची हिंमत ठेवा, अपयश आल्यावर ती पचवण्याची हिंमत ठेवा. अजून प्रयत्न करा. कष्ट, मेहनत केल्याशिवाय मोठे होता येत नाही. मोठी माणसे यांचे मोठेपण आपल्याला दिसते पण त्याचे अनालिसिस (विश्लेषण) करा कारण त्यांनी मोठे होण्यासाठी किती कष्ट उपसले असतील हे समजून घ्या. स्वतःचा विकास म्हणजे प्रगती नाही तर सर्वांना घेऊन पुढे जाणे किंवा सर्वांच्या विकासामध्येच खरी प्रगती आहे.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री संत बाबा सुखविंदर सिंघजी यांनी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व आशिर्वाद दिले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी पदवी घेऊन संस्थेतून बाहेर पडत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुढे ते म्हणाले कि, जगात विविध क्षेत्रात प्रगती होत आहे त्याचा कणा म्हणजे अभियंते आहेत, कारण अभियंत्यामध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. शिस्त (डिसिप्लिन), सचोटी/प्रामाणिकपणा (इंटिग्रिटी) आणि (गुन्नावत्ता) एक्सलन्स हे फार महत्त्वाचे घटक आहेत. तुम्ही संस्थेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून बाहेर पडणार आहात भारतास आत्मनिर्धार बनविण्यात आपले योगदान लाभणार आहे. म्हणून तुम्ही संस्थेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून वागताना संस्थेचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करा. आपले व संस्थेचे नाव कमवा.
भारताचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त अभियंत्यामध्येच आहे. आपण समाजाला काय देऊ याचा विचार करा. आपल्या आयुष्यात पालकाचा सुद्धा तेवढाच वाटा आहे, कारण त्यांनी तुम्हाला सर्व सोयी सुविधा पुरविल्या आपण अडचणीत असतानाही तुम्हाला सर्व सुख सुविधा दिल्या त्यामुळे तुमच्या विकासामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाट आहे.
यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील प्राध्यापिका सौ. शिल्पा चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. तेजस भाटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यासह एन.एस.एस. च्या टीमने डॉ. माधव वैद्य, डॉ. दीपक वागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवाला.
सकाळच्या सत्रात संस्थेमधून विविध विद्याशाखेतील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष आणि अंतिम वर्षात प्रत्येक विद्याशाखेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक, रोप्य पदक व कांस्यपदक आणि सर्टिफिकेट ऑफ मेरिट देऊन गौरवण्यात आले. संस्थेमधील या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि कौतुक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी गोदावरी ड्रग्स चे मॅनेजर श्री देशमुख सर तसेच गोदावरी ड्रगचे उपाध्यक्ष श्री जोगईकर हे उपस्थित होते.